|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुऱ्हा देवी या गावात विराजमान असणारी पूर्णाकृती देवी ही माहूरची रेणुका देवी आणि मैहरची शारदा देवी यांची बहीण असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ८०० वर्षांपासून मुऱ्हा देवी या ठिकाणी विराजमान आहे. पूर्वी सातपुडा पर्वत रांगेत राहणारे आदिवासी बांधव रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरला जायचे. हे अंतर फार लांब असून इतक्या दूर देवीच्या दर्शनाला जाणं म्हणजे वेळही फार लागायचा. आठशे वर्षांपूर्वी मुहादेवी स्वतः सातपुड्याच्या पायथ्याशी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. मुऱ्हा देवीच्या मूर्तीचा चेहरा पाहिला तर या मूर्तीचे डोळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यासारखे भासतात. हे बोलके डोळे पाहून काही क्षणासाठी भाविक थक्क होतात. बेलपत्र आणि महादेवाची पिंड मुऱ्हा देवीच्या डोक्यावर आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी समान मोत्याची माळ देवीच्या गळ्यात आहे. अनेक मंदिरात पुजारी म्हणून पुरुष गाभाऱ्यात असतात. मुऱ्हा देवीच्या मंदिरात पुरुषासोबतच महिलांना देखील पूजेचा मान असतो. या मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व भाविकांना प्रवेश दिला जातो. मुऱ्हा देवी म्हणजे आदिवासींची देवी असं पूर्वी म्हटलं जायचं. आज देखील मेळघाटातील कोरकू आणि गोंड जमातीचे भाविक आपल्या गावातून देवीच्या दर्शनाला पायी चालत येतात. मंदिर परिसरात आदिवासी पारंपरिक गीत गात नृत्य करतात. आपल्या शेतीचं आणि जनावरांचं रक्षण कर अशी प्रार्थना आदिवासी भाविक करतात. ज्या भागात हे मंदिर आहे त्या संपूर्ण परिसरात सामान्य शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अंजनगाव, अचलपूर, दर्यापूर, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातून मोठ्या संख्येनं शेतकरी नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाला येतात. विशेष म्हणजे या परिसरातील नवी पिढी जी कामानिमित्त मुंबई, पुणे आणि इतर प्रदेशात आहे ते सारे नवरात्रोत्सवात आपल्या देवीच्या दर्शनाला येतात.
देशातील मंदिरं हरिजनांसाठी खुली करावीत असं आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केलं होतं. तसं पत्रच त्यांनी सर्व मंदिरांना दिलं होतं. त्यावेळी विदर्भात वर्धा शहरात लक्ष्मी नारायण मंदिर हे पहिल्यांदा खुलं झालं. त्यानंतर ग्रामीण भागात हरिजनांसाठी खुलं होणारं मुऱ्हा देवीचं मंदिर हे पहिलं. त्यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष महादेव पाटील घोगरे यांनी हरिजनांसाठी मंदिर खुलं केलं.
मुऱ्हा देवीचं मंदिर हरिजनांसाठी खुलं झालं अशी माहिती मिळाल्यावर महात्मा गांधी यांनी या मंदिरात येण्याचा निर्णय घेतला. अंजनगाव सुर्जीपर्यंत महात्मा गांधी पोचले देखील होते. मात्र, काही महत्वाच्या कामामुळं त्यांना परतावं लागलं. यानंतर २९ डिसेंबर १९३३ रोजी महात्मा गांधी यांनी मुऱ्हा देवी मंदिर संस्थानला पत्र लिहिलं. मी मंदिरात येऊ शकलो नाही. याबाबत त्यांनी पत्रात खंत व्यक्त केली. "हरिजनांना मंदिरात प्रवेश दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो" असा उल्लेख पत्रात आहे. हे पत्र आज देखील मंदिर विश्वस्थांकडं उपलब्ध असून या पत्राची प्रत मंदिर परिसरात लावण्यात आली आहे.